Pune City News:- देशातील टाळेबंदी (लॉकडाउन) उठणार की नाही याबाबत अजूनही साभ्रंम कायम आहे. देशव्यापी टाळेबंदी बाबत 3 मेनंतर निर्णय घेण्यात येणार असून यात टाळेबंदी हटविण्याबाबत एक धोरण निश्चित करावे लागेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेदरम्यान म्हटले आहे.
3 मे नंतर टाळेबंदी वाढवायची की नाही, यावर आज निर्णय झालेला नाही. मात्र, 3 मे नंतर सूट द्यावी अशी स्थिती देशात नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मुख्यमंत्र्यांनी बैठकीत म्हटले आहे.10 राज्यांनी टाळेबंदी च्या बाजूने आपले मत नोंदवले आहे. तेलंगणा या राज्याने तर या पूर्वीच राज्यातील लॉकडाउन 7 मे पर्यंत वाढवले आहे. 3 मेनंतर ग्रीन झोनमधील बंदी हटवली जाऊ शकते परंतू ग्रीन झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंग मात्र सुरूच राहील.
3 मे चा दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? पंतप्रधानांकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना
▪️ 3 मे रोजी दुसरा लॉकडाऊन संपण्याची तारीख असली तरी विशेषत: रेड आणि ऑरेंज झोन मध्ये अतिशय काळजी घेण्याची आणि काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
▪️ संक्रमण क्षेत्रांची संख्या वाढणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करावा लागेल.त्यासाठी जे जे काही करणे आवश्यक आहे ते करा.
▪️ पुढे चालून रेड, ऑरेंज, ग्रीन झोननिहाय लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्यांना धोरण ठरवावे लागेल. कुठली वाहतूक सुरु राहील, ज्येष्ठांनी घराबाहेर पडावे का नाही, दुकाने कशी सुरु राहतील इत्यादी
▪️ मोठ्या शहरांत रेड झोन्स आहेत पण उर्वरित ठिकाणी ते फैलावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. या सर्व रेड झोन्सचे व्यवस्थित विश्लेषण आणि मुल्यांकन करा.संक्रमित व्यक्तींचे जास्तात जास्त संपर्क तपासा.
▪️ सध्याच्या उद्रेकात ग्रीन झोन्स म्हणजे तर तीर्थस्थळेच म्हटली पाहिजेत.
▪️ येणाऱ्या दिवसांत ग्रीन झोन मॉडेल्स बनवा. जीवन पद्धती, आपले कामकाज त्यानुरूप बनवण्याची गरज
▪️ ज्या राज्यांत कोरोनाचा आकडा वाढतोय म्हणजे काही ती राज्ये गुन्हेगार आहेत असे नाही. आकड्यांचा दबाव घेऊ नका. भयभीत होऊ नका. अशा राज्यांनी खाली मान घालण्याची गरज नाही. ज्या राज्यांमध्ये आकडे कमी आहेत म्हणजे काही ती महान आहेत असा अर्थ होत नाही. आपण सगळे एकाच संकटातून जात आहोत. काहीही लपवू नका.
▪️ कोरोनाशिवाय जे इतर आजारांचे रोगी आहेत त्यांना योग्य उपचार मिळालेच पाहिजेत. यात ढिलाई नको. आपली परंपरागत वैद्यकीय व्यवस्था सुरु राहिलीच पाहिजे. डॉक्टरांनी दवाखाने सुरु केले पाहिजेतच.
▪️ ज्या क्षेत्रांमध्ये कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव आहे तिथे अर्थातच आर्थिक नुकसानही जास्त होणार . 20 एप्रिलनंतर आपण काही ठिकाणी शिथिलता आणली पण त्यामुळे आपले आव्हानही वाढले आहे. नक्की कुठले प्रश्न वाढले आहेत ते अभ्यासा.
▪️ रेड झोनमधून ऑरेंज आणि ऑरेंजमधून ग्रीन झोन मध्ये कसे जायचे याचा नियोजन आवश्यक आहे.
▪️ हीच सुसंधी आहे सुधारणा घडविण्याची. अनेक जुने आणि किचकट नियम आणि प्रक्रिया बदलण्याची संधी सोडू नका. आपदधर्माचे पालन करा. नीती आणि नियम जुने असतील तर आलेली संधी जाईल.
▪️ प्रत्येक राज्याने रिफॉर्म्सवर लक्ष द्या. संकटाला संधीत बदला
▪️ तंत्रज्ञानाचा खूप उपयोग होऊ शकतो. गर्दी आणि गडबड टाळू शकता.

