पुणे शहरातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात सामान्य नागरिकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत असून त्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सची माहिती आणि उपलब्धता एकाच छत्राखाली आणून बेड मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब करावा, अशी मागणी आज उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या बैठकीत केली. यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
रुग्णांना बेड्स उपलब्ध होण्यासाठी तातडीने केंद्रीय पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. ही पद्धत अवलंबल्यास रुग्णांना खाटा उपलब्ध होऊ शकतील.
पुणे शहरात दररोज ६ हजारपेक्षा जास्त चाचण्या होत असल्या तरी त्यात सरकारी संस्थांकडून होणाऱ्या आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या तुलनेने कमी असून यावर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. यासाठी आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवावी. यामुळे संसर्ग आटोक्यात आणण्यात मदत होऊ शकेल.
कोरोना संसर्गाच्या सुरुवातीपासूनच्या काळात नजीकच्या काळातील अंदाज बांधून रुग्णसंख्या आणि संभाव्य बेड्सची माहिती बैठकीत उपलब्ध केली जात होती. त्या आधारावर नियोजन करणे सहज शक्य होते. मात्र गेल्या तीन बैठकांमध्ये ही माहिती सादर होत नसल्याने आपण बैठकीत समोर आणले. विशेष म्हणजे जम्बो रुग्णालयाची निर्मिती याच अंदाजाच्या आधारावर करण्यात आली होती.
‘जम्बो’चा गाडा आता रुळावर येत असला तरी नियोजित क्षमतेनुसार जम्बो आणि बाणेर केंद्राचे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड्स कमीत कमी कालावधीत उपलब्ध करा, अशीही सूचना बैठकीत केली. जम्बो आणि बाणेरचे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

