पुणे शहर :- राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण सुरू केलं आहे. पण सध्या सर्वत्र लसीचा तुटवडा जाणवत असल्यानं लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. पण पुण्यात वेगळाच गोंधळ पहायला मिळत आहे. शहरांत लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ होत असल्याचं चित्र समोर येत आहे.
लसीकरणासाठी पुण्यासाठी 8 वाजता ऑनलाईन नोंदणी सुरू होते, मात्र पावणे आठच्या सुमारास लसीकरण केंद्रांवरील बुकिंग फुल झाल्याचं दाखविलं जात आहे. लसीच्या स्लॉट बुकिंगमध्ये वशिलेबाजी सुरू असल्याचा आरोप शहरातील सामान्य नागरिक करत आहेत. नागरिकांच्या हातात मोबाईल घेऊन बुकिंगसाठी धडपड करताना दिसत आहे.
चार मिनिट मध्ये येरवडा राजीव गांधी हॉस्पिटल मधील लसीकरण फुल @mohol_murlidhar @PMCPune pic.twitter.com/TyGSVqMeWJ
— PunecityNews (@PuneCityNews) May 10, 2021
शहरात तरूण वर्गाची लोकसंख्या सुमारे 22 लाख इतकी आहे. राज्य सरकारकडून 10 दिवसांत फक्त 15 हजार लसींचे डोस आले आहेत. त्यातील 13 हजार जणांचे लसीकरण झालं आहे. त्यामुळे पुण्यात मंगळवारी केवळ दोनच केंद्रावर लसीकरण चालू आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याचं मोठं आव्हान पुणे महापालिकेसमोर आहे.
दरम्यान, स्लॉटसाठी लिंक ओपन करण्याचे सर्व अधिकार संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत. शासनाचा यात काही संबंध नाही, असं कुटुंब नियोजन मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. प्रशासनाच्या या सावळ्या गोंधळामुळे सामान्य लोकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

