PUNE CITY NEWS :- पुण्यात एका प्रेम प्रकरणातून मामाने आपल्या भाचीसोबतच तिच्या प्रियकाराचेही अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार चतुःशृंगी पोलिसांनी समोर आणला आहे. याबाबत नागरिकांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले आहे.
दत्तात्रय रामचंद्र भोईटे (वय ३४, रा.वाघोली,सातारा), संदीप किसन जाधव (वय २८, रा.आर्डे, सातारा) अक्षय कृष्णा दिक्षीत (वय २६,रा.आर्डे,सातारा), सागर अनिल कोळेकर (वय २३, रा.सुरुर, सातारा), मंगेश राजाराम खंडजोडे (वय १८),शुभम नवनाथ बरकडे ( वय २०), मंगेश रमेश शिंदे, वय २१), राहुल बाळासाहेब बरकडे (वय २७, चोघेही रा. लिंब, सातारा), किरण दिलीप बाबर, वय २३, रा.सातारा) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी ऋतिक मोहिते (वय २७) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सेनापती बापट रस्त्यावरील एका कंपनीत एक तरुण कामाला होता. त्याचे त्याच्या कंपनीतील एका तरुणीवर प्रेम होते. ही गोष्ट मुलीच्या वडिलांच्या कानावर गेली. त्यांनी मुलीचा मामा दत्तात्रय भोईटे याला ही गोष्ट सांगितली.
मुलीच्या मामाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने तरुण आणि तरुणीला पोलीस स्टेशनला जाण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने गाडीत बसवले. त्यानंतर सातारा महामार्गावर कात्रज घाटाच्या पुढे तरुणाला मारहाण करून गाडीच्या खाली उतरून दिले. व मुलीला घेऊन ते साताऱ्याच्या दिशेने पलायन केले.
या प्रकाराबाबत नागरिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनेची दखल घेत चतुःशृंगी पोलिसांनी आज ( रविवारी) पहाटे साडेतीनच्या सुमारास सातारा येथील टोलनाक्यातून आरोपींना ताब्यात घेतले. अधिक तपास चतुःशृंगी पोलीस करत आहे.

