पुणे शहर – हिमाचल प्रदेशातून पुणे रेल्वे येथील तब्बल 120 कोटी रुपयांच्या चरस प्रकरणाच्या तपासाचे तपासात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत पुणे (रेल्वे )लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड यांच्यासह 8 जणांना अपर पोलीस महासंचालक (लोहमार्ग) प्रज्ञा परवदे यांनी निलंबित केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र गौड, पोलीस शिपाई संतोष विष्णू लाखे, माधव मारुती झेंडे, गणेश अशोक शिंदे, श्रीकांत मार्केंडय बोनाकृती, गंगाधर केशाव, अशोक अकबर गायकवाड आणि कैलास प्रकाश जाधव अशी निलंबित केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशातून रेल्वेमार्गे चरस घेऊन आलेल्या दोघांना रेल्वे पोलिसांनी पकडले होते. त्यांच्याकडून 34 किलो 404 ग्रॅम चरस जप्त करण्यात आले होते. ललितकुमार दयानंद शर्मा (वय 49, रा. भुंतर, जि़ कुलु) आणि कौलसिंग रुपसिंग सिंग (वय 40, रा. बंद्रोल, जि़ कुलु, हिमाचल प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हा चरस पुणे, मुंबई, गोवा, बंगळुरु येथे नववर्षाच्या पार्टीमध्ये विक्री करण्यात येणार असल्याचे आरोपींनी सांगितले होते.
तपासादरम्यान लोहमार्ग पोलिसांनी अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. तसेच दोघाही आरोपींना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्या विरोधात तातडीने गुन्हा दाखल न करता त्यांना पुणे रेल्वे स्टेशन जवळील एका हॉटेलवर ठेवण्यात आले. त्यातून आरोपींना पोलिसांवर आरोप करण्याची संधी मिळाली असल्याचे समजते. या प्रकरणात तक्रार आल्यानंतर त्याची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यानंतर अपर पोलीस महासंचालक (रेल्वे) प्रज्ञा सरवदे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.

