कोरोनाच्या संकट कमी होत असताना पुण्यातील नाट्यसृष्टी पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पुण्यातील नाट्यसृष्टी पुन्हा एकदा “अनलॉक” झाली आहे.
पुण्यात नाटक सुरू करण्यासंदर्भात ज्येष्ठ रंगकर्मी प्रशांत दामले आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी महापौर मुरलीधर मोहोळ यांची सविस्तर चर्चा झाली होती. या संदर्भात आढावाही घेण्यात आला होता.
याबाबत महापौर मोहोळ यांनी सांगितले की, नाट्यगृह सुरू करण्या अगोदर सर्वच नाट्यगृहांची साफसफाई करुन घेतली होती. यानंतर शनिवारी( दि. १२) रोजी कोथरुड येथील यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाने पुण्यातील नाट्यसृष्टी ‘अनलॉक’ झाली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बैठक व्यवस्थेसह इतर बाबींची अंमलबजावणी केली असतानाही नाट्यप्रेमींचा उत्साह वाखाणण्याजोगा असल्याचे पहायला मिळाले.
यावेळी प्रशांत दामले, कविता लाड, मोहन जोशी, सतीश आळेकर, उल्हासदादा पवार, केशव उपाध्ये, सलील कुलकर्णी, बेला शेंडे, ऋषीकेश रानडे, पृथ्वीराज सुतार, अमोल रावेतकर यांच्यासह नाट्यप्रेमी आणि रसिकांची उपस्थिती होती.

