Pune City News:- कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने उपाययोजनांची व्याप्ती तातडीने वाढवावी, अशी आग्रही मागणी आज विभागीय आयुक्तांकडे केली. तर कोरोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा विशेष विमा काढावा आणि सुरू असलेल्या खासगी संस्थाबाबत माहिती प्राप्त करण्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर तयारी, सद्यस्थिती आणि उपाययोजना याचा आढावा घेणारी महत्त्वाची बैठक आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेत पार पडली. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात संवाद ठेवून पुढील परिस्थितीचा सामना करण्यासंदर्भात या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी विभागीय आयुक्त म्हैसेकर, सभागृहनेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनु गोयल यांच्यासह इतर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
राज्यशासन, जिल्हा आणि महापालिका प्रशासन आपापल्या पातळीवर कोरोना विषाणूंशी लढा देतच आहे. येणाऱ्या पुढील काळात कोरोनाला परतवून लावण्याच्या दृष्टीने पदाधिकारी आणि अधिकारी यांनी मिळून लोकांमध्ये जनजागृती करून, कोरोनाची भीती घालवण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज आहे.
आपण विभागीय आयुक्तांकडे केलेल्या काही मागण्या…
१) पुणे स्टेशनमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे, तरी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी योग्य तो मार्ग काढावा.
२) पीएमपीएलच्या बसेस बद्दलचा निर्णय घेण्यात यावा.
३) परदेशातून आलेल्या व्यक्तीमुळे संसर्ग पसरत आहे, या धर्तीवर विमानतळावर प्रवाशांची तपासणी केली जातच आहे. परंतु मुंबई-पुणे रस्ते वाहतुकीचे मार्फत मुंबईमार्गे येणाऱ्या प्रवाशांची टोलनाक्यावर तपासणी केली जावी.
४) आपल्या आजूबाजूला असलेल्या परदेशातून आलेल्या आणि लक्षणे दिसणाऱ्या एखाद्या प्रवाशांची माहिती सांगण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन नंबरची व्यवस्था करावी व त्याचा पाठपुरावा प्रशासनाकडून घेण्यात यावा.

