पुणे शहरात कोविड-१९ कोरोना विषाणूची लागण मोठ्या प्रमाण वाढले आहे. गेल्या काही काळात पुणे देशातील सगळ्यात मोठे हॉट स्पॉट सिटी बनलेले आहे. ही काळजीची बाब आहे.
तसेच मृत्यूचे थैमानही कमी होताना दिसत नाही. या परिस्थितीत ऑक्सिजन पुरवठा करणे, शहरात डॉक्टरची फिरती पथके तयार करणे, कोरोनाची सौम्य लक्षणे आलेल्या रुग्णांवर घरीच उपचार करणे व बाहेरून येणाऱ्या रुग्णांची व नातेवाईकांची शहराच्या नऊ कॉरिडॉरमधून प्रवेश करताना आरोग्य तपासणी करून तेथील जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे यामुळे कोरोना रुग्णांना चांगले उपचार मिळतील व कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होईल, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी केली आहे.
यावेळी बागुल म्हणाले की, पुणे शहरात विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना त्यांची तब्येत ढासळत असताना ऑक्सिजन देण्याची नितांत गरज असते. तसेच व्हेंटिलेरसाठीही ऑक्सिजन महत्वाचे आहे.
मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हे लक्षात घेऊन इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ बंद करून तो ऑक्सिजन हॉस्पिटल्सला पुरवणे ही काळाची गरज बनली आहे.
त्यासाठी किमान एक महिना अथवा आवश्यकता असेल तर अधिक काळ पुणे व परिसरात दिला जाणारा इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा पुरवठा थांबवून तो संपूर्ण ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना रुग्णांच्यासाठी वापरणे बंधनकारक करावे.
पुणे शहरात ग्रामीण भागाच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात आरोग्य सुविधा आहेत. त्या मुळातच कोरोनाग्रस्त पुणेकरांना कमी पडत आहेत. मात्र लोणावळा, खंडाळा, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर अश्या विविध भागातील कोरोना रुग्ण पुण्यात उपचारासाठी येताना दिसतात.यावर गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा असे आबा बागुल म्हणाले आहे.

