वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज अचानक दोन दिवसांच्या लेह दौऱ्यावर आहेत.
दक्षिण पॅन्गाँग सरोवराजवळच्या भागात चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी नुकताच हाणून पाडला होता. पॅन्गाँग जवळच्या टेकडीवर भारतानं आपली पकड मजबूत केलीय.
चर्चा : आपल्या लेह दौऱ्यात लष्करप्रमुख लेह-लडाख भागातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुख सीमेवर तैनात अधिकाऱ्यांशी रणनीतीवर चर्चा करू शकतात.
भारत आणि चीन दरम्यान सैन्य संवादानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. अनेक भागांत दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये आहेत.
नरवणे दक्षिण पॅन्गाँग भागात चीनच्या कारवायांची माहिती घेतील तसंच चिनी जवानांची घुसखोरी रोखणाऱ्या जवानांचीही ते भेट घेतील. लेहमध्ये सध्या भारतीय लष्कर आणि वायुसेना पूर्ण सज्ज आहेत.
वायुसेनेचं लढावू विमान सतत सीमेवर नजर ठेवून आहे. चीनसोबत तणाव वाढल्यानंतर नरवणे यांनी आपला म्यानमार दौरा रद्द केला होता. त्यानंतर ते लेह दौऱ्यावर दाखल झाले आहेत.

