हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार देश व विदेशात मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यासाठी सिनेमा क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) हीरकमहोत्सवी वर्षांनिमित्त २१ फूट उंचीचे ‘नभ अभीप्सा’ शिल्प निरुपयोगी साहित्यांपासून साकारण्यात आले आहे. या अद्वितीय धातुकला शिल्पाचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेचे संचालक भुपेंद्र कँथोला, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम आदि उपस्थित होते.
‘नभ अभीप्सा’ धातुकला शिल्प हे जुन्या व निर्जीव साहित्यांपासून सुंदर कलाकृती उभारणी केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करत राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, दूरदर्शन व इतर माध्यमातून या सुंदर कलाकृतीचा प्रसार करा, ज्यामुळे विश्वातील लोक येथे ही कलाकृती बघण्यासाठी येतील. मनोरंजनासोबतच ज्ञानप्रसाराचे काम होत असल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या.


