पुणेहडपसर

पुणे शहरातील पहिला 400 KW सौर ऊर्जा प्रकल्प कोंढव्यातील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये सुरू

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या क्षमतेचा 400 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोंढवा येथील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटमध्ये उभारण्यात आला असून त्याचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर (दि. 19 मार्च) मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रकल्पाचे उद्घाटन मा. योगेश आण्णा टिळेकर (आमदार, विधानपरिषद) यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक 40 च्या नगरसेविका श्रीमती रंजना टिळेकर, सौ. अर्चना जगताप, सौ. वृषाली कामठे, सौ. पूजा कदम तसेच स्थानिक कार्यकर्ते राहुलअप्पा टिळेकर, तुषार कदम, श्रीकांत कामठे, उमेश दांडेकर उपस्थित होते.
सुमारे 1600 सदनिकांचे कोंढव्यातील हे मोठे निवासी संकुल असून येथे उभारण्यात आलेला हा 400 KW सौर ऊर्जा प्रकल्प पुणे शहरातील निवासी संकुलांमधील पहिला आणि सर्वात मोठा प्रकल्प मानला जात आहे. या प्रकल्पामुळे अपार्टमेंटच्या सामायिक वीज वापराचा मोठा भाग सौर ऊर्जेतून भागवला जाणार असून वीज खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लागणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोसायटीचे सेक्रेटरी पांडुरंग भोले यांनी प्रास्ताविक करत प्रकल्पाच्या उभारणीचा प्रवास मांडला. अध्यक्ष सूर्यकांत खुरसे यांनी या प्रकल्पामागील उद्दिष्टे स्पष्ट करत सर्व सभासदांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी सुमारे 2.25 कोटी रुपयांचा खर्च झाला असून सरकारी धोरणानुसार अंदाजे 68 लाख रुपयांची सबसिडी अपेक्षित आहे. प्रकल्पामुळे दरवर्षी अंदाजे 1 कोटी रुपयांची वीज बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.
सोलर कमिटीचे सदस्य संजय मुळे यांनी तांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली, तर रुपेश शहा यांनी स्ट्रक्चरल आव्हानांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी आमदार योगेश आण्णा टिळेकर यांनी सौर ऊर्जेच्या वाढत्या गरजेवर प्रकाश टाकत अशा प्रकल्पांमुळे शाश्वत विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. त्यांनी थ्री ज्वेल्स अपार्टमेंटच्या या उपक्रमाचे कौतुक करत राज्य सरकारच्या सौर ऊर्जा प्रोत्साहन धोरणाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपाध्यक्ष प्रल्हाद दुधाळ यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कोंढवा परिसरातील थ्री ज्वेल्स अपार्टमेंटने उभारलेला हा प्रकल्प पुणे शहरासाठी एक नवा आदर्श ठरत असून इतर गृहनिर्माण सोसायट्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Related posts

शहर सायबर पोलिसांनी सावधगिरीचा दिला इशारा

Vishal Khandagale

मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई

Vishal Khandagale

देशातील प्रवासी रेल्वे सेवा बंद !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX