Pune City News
गुन्हे विषयकपुणेपुणे शहर

येरवडा कारागृहात फरशीने हल्ला : एका कैद्याचा मृत्यू, दोन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल !

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील बराक क्रमांक १ मध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेत दोन कैद्यांनी एका कैद्यावर फरशीने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत कैद्याचे नाव विशाल नागनाथ कांबळे (वय २८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असून, १५ डिसेंबर रोजी सकाळी सुमारे पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली.

या प्रकरणात आरोपी आकाश सतीश चंडालिया (वय ३०, रा. जय जवाननगर) आणि दीपक संजय रेड्डी (वय २७, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत) यांच्यावर सुरुवातीला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारादरम्यान कांबळेचा मृत्यू झाल्याने आता या दोघांवर खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातच चंडालिया, रेड्डी आणि कांबळे यांच्यात वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि चंडालिया व रेड्डी यांनी फरशीचा तुकडा उचलून कांबळेच्या डोक्यावर व अंगावर वार केले. आरडाओरड ऐकून कारागृहातील रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून आरोपींना आवरले. मात्र कांबळे गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच येरवडा विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंजुमन बागवान यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींची माहिती घेतली जात आहे.

दरम्यान, कांबळेच्या मृत्यूची बातमी कळताच ससून रुग्णालय परिसरात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंडगार्डन पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेमुळे येरवडा कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उच्च सुरक्षेच्या कारागृहात फरशीसारखे साहित्य कैद्यांच्या हाती कसे लागले, रक्षकांची देखरेख कितपत प्रभावी होती, आणि अशा घटना रोखण्यासाठी नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत आहे—असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणामुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Related posts

1 मे नंतर देखील लसीसाठी ज्येष्ठ नागरिकांनाच प्राधान्य : महापौर मोहोळ

Vishal Khandagale

तरुणाचा दगडाने ठेचून खून

Vishal Khandagale

आयपीएल क्रिकेट स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली

Vishal Khandagale

Leave a Comment