कोथरूडमधील भेलकेनगर चौक ते आशिष गार्डन रस्त्यावरील परांजपे हायस्कूल ते बधाई चौकापर्यंत जाणार्या रस्त्याचा अनेक वर्षांपासून प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
कमिन्स इंडिया कंपनीच्या ताब्यातील काही जमीन पुणे महानगरपालिकेला देण्यासंदर्भात अनेक दिवसापासून सातत्याने प्रयत्न सुरू होते. आता कमिन्स कंपनीच्या ताब्यातील जमीन आपल्या महापालिकेच्या ताब्यात आली असून रस्त्याचे काम सुरू होत आहे. या भागात प्रत्यक्ष महापौर मोहोळ यांनी रस्त्याची पाहणी केली.
अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचे काम आता होणार असून यामुळे परिसरातील नागरिकांना वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.
या पाहणी प्रसंगी नगरसेविका वासंती जाधव, हर्षालीताई माथवड, पथ विभागाचे प्रमुख व्ही. बी. कुलकर्णी, भूसंपादन अधिकारी जे. पी. पवार, महापालिका सहआयुक्त संदीप कदम, तसेच कमिन्सचे अधिकारी उपस्थित होते.
कमिन्स कंपनी मागील गांधी भवनकडे जाणारा रस्ताही आता मोठा होणार असून तिथेही जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

