पुणे शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शास्त्रज्ञाला व्हेंटिलेटर अभावी आपले प्राण गमवावे लागल्याची घटना समोर आली आहे.
डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन ( वय ६१) यांना व्हेंटिलेटर वेळेत उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. नरसिंहन हे पुण्यातील बिटनीकल सर्व्हे ऑफ इंडियात वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते निवृत्त झाले होते. यातून आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचाराअभावी त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
याबाबत माहिती देताना एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, डॉ. नरसिंहन यांना मंगळवारी( दि.१४) रोजी सायंकाळच्या सुमारास शवसनाचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र व्हेंटिलेटर अभावी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला.
मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांच्या अगोदर व्हेंटिलेटरसाठी वेटिंग होते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकला नाही, त्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.मात्र आज(बुधवारी) पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

