पुणे शहर न्यूज़:- आज जागतिक ग्राहक हक्क दिन. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार दर्जेदार वस्तूंची निवड तसेच त्या वस्तूची गुणवत्ता जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार ग्राहकास प्रदान करण्यात आलेला आहे.
ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, जिल्हा न्यायालय, तसेच जिल्हा तक्रार निवारण याप्रमाणे राज्य व राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.
जागतिक स्तरावरील पाठपुराव्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांसाठी एक व्यासपीठ तयार केले, आणि युनेस्कोने त्यास मान्यता दिली. त्याप्रमाणे 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो.
ग्राहक हा बाजारपेठेचा राजा असून, अनेकदा एका वस्तूवर एक फ्री अशा योजनेंमध्ये ग्राहकाची फसवणूक होत असते त्यामुळे ग्राहकांनीच सतर्कता बाळगून कुठल्याही अमिषाची बळी न पडता वस्तूंची खरेदी केली पाहिजे.
ग्राहकांनी वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. वस्तू खरेदी करतांना वस्तूची संपूर्ण माहिती घेऊनच खरेदी करा. वस्तूंची ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांनी सतर्क राहावे, तसेच एक्सपायरी दिनांक तपासून पाहावी.
त्याचप्रमाणे बाजारपेठेतील वस्तूंची खरेदी करताना आपण ज्या वस्तू घेतल्या असतील त्याचे बिल मागण्याचा अधिकार ग्राहकास असतो, विशेषतः सोने खरेदी करताना हॉलमार्क पाहूनच खरेदी करावे.
ग्राहकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासल्यानंतरच पेट्रोल भरा, तसेच डबाबंद खाद्यपदार्थांची व्यवस्थित पाहणी करूनच खरेदी करणे. आणि महत्वाचे म्हणजे वस्तूंची खरेदी करताना एमआरपीपेक्षा जास्त किंमत अदा नये.
बाजारपेठेतील ग्राहक खरेदी करत असताना अनेकदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करता त्यामुळेच ग्राहकांची बऱ्याचदा फसवणूक होते.

