पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांनी विद्यावेतन वाढीसाठी रुग्णालयासमोर आजपासून आंदोलन सुरू केले आहे.
आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन कोरोनाविरोधात लढत आहोत. तरीही आम्हाला तुटपुंजे मानधन दिले जाते. मुंबई महापालिकेप्रमाणे आम्हाला विद्यावेतन वाढ द्यावी, अशी मागणी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
तसेच महापालिका प्रशासन विद्यावेतन वाढ देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोपही डॉक्टरांनी यावेळी केला आहे. महापालिकेचे वायसीएम रुग्णालय कोविडसाठी समर्पित आहे. रुग्णालयातील सीपीएस निवासी डॉक्टर २४ तास प्रामाणिकपणे आपली सेवा देत आहेत.
या ३३ डॉक्टरांना ऑगस्ट २०२८ पासून २४ हजार ८०० रुपये तुटपुंजे विद्यावेतन मिळत आहे. सध्या कोरोना साथीच्या परिस्थितीमध्ये संसर्ग होऊन जीवाला धोका होण्याची जास्त भीती आहे. तरीही, जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत.
विद्यावेतन कमी मिळत असल्याने शहरात राहणे कठीण बनले आहे. त्यामुळे आमच्या वेतनात वाढ व्हावी, यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

