Pune City News:- कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार होणार असून राज्यात दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत 1 लाख शिवभोजन थाळीचे वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या निर्णयामुळे सध्याच्या परिस्थितीत गरजु नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
थाळीच्या संख्येत पाचपट वाढ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार केला असून प्रत्येक जिल्ह्यात दिलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ केली आहे.
पाच रुपये दर जूनपर्यंत लागू : शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये व ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने 160 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाची उपासमार न होण्यासाठी सवलतीने पाच रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.

