गुन्हे विषयकपुणे

पुण्यात २२ पोलिस अधिकाऱ्यांचा केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकाने सन्मान !

गुन्हे तपासातील उत्कृष्ट कामगिरीची दखल; पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पदक व प्रशस्तीपत्र प्रदान

पुणे | १० ऑगस्ट २०२६ : गुन्ह्यांच्या तपासात उत्कृष्ट कौशल्य, आधुनिक तपास पद्धतींचा प्रभावी वापर आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील २२ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (अन्वेषण) प्रदान करण्यात आले. सन २०२३ आणि २०२४ या वर्षांसाठी पात्र ठरलेल्या अधिकाऱ्यांचा पदक प्रदान सोहळा ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथील पोलीस संशोधन केंद्रात पार पडला. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.

केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकारकडून सन २०१८ पासून गुन्हे तपासात उत्कृष्ट प्राविण्य दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना हे पदक देण्यात येते. या पुरस्काराचा समावेश सध्या केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक यामध्ये करण्यात आला आहे.

२२ अधिकाऱ्यांचा गौरव

सन २०२३ आणि २०२४ साठी महाराष्ट्रातील एकूण २२ पोलीस अधिकाऱ्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. यामध्ये २ पोलीस अधीक्षक, ४ पोलीस उपअधीक्षक, ९ पोलीस निरीक्षक, ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १ पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

गंभीर गुन्ह्यांच्या तपासातील उल्लेखनीय कामगिरी

पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांनी खून, दरोडा, खंडणी, सावकारी कायद्यांतर्गत गुन्हे, जबरी चोरी, अपहरण, लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलांचे अपहरण, सायबर गुन्हे तसेच इतर गंभीर गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास केला आहे. आधुनिक तपास पद्धती, डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करून अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याचे पोलीस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पुरस्कारासाठी निवड करताना महाराष्ट्र पोलिसांकडून आलेल्या शिफारशी आणि तपास अहवालांची छाननी करण्यात आली. त्यानंतर निवड समितीमार्फत पात्र अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठविण्यात आली.

विविध विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश

या सोहळ्यास अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे (पिंपरी-चिंचवड), पोलीस आयुक्त अमितेश कुमार (पुणे शहर) तसेच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुरस्कार विजेते अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवरांचीही उपस्थिती होती.

पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पुरस्कारप्राप्त सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या.

Related posts

खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा: मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

अतिसंवेदनशील भागाची मनपा व पोलिस प्रशासनाच्या वतीने पाहणी

Vishal Khandagale

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केले

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.