शाळेमध्ये शालेय साहित्याची विक्री करु नये, असा शासनाचा आदेश असतानाही शहरातील खासगी शाळा आदेशाला जुमानत नाहीत, अशा घटना शहरात घडत आहेत.
पालकांना शाळेत बोलावून सक्तीने पुस्तके विक्री करण्याचा प्रकार वाकड येथील गुड सॅमरिटन शाळेत घडला.
याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने जावून शाळेच्या दोन खोल्या सील केल्या आहेत.
शहरातील शाळांकडून शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून कधी फीबाबत तर कधी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी पालकांकडे तगादा लावण्याचे सत्र सुरु आहे.
आज (मंगळवारी) पुन्हा वाकड येथील गुड सॅमरिटन शाळेत पालकांना बोलावून पुस्तके खरेदी करण्यास सांगितले होते.
अशा प्रकारे शाळेत शालेय साहित्य विक्री करणे हा शासनाच्या नियमाचा भंग आहे. शाळेने नियमभंग केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने जावून पाहणी करुन शाळेच्या दोन खोल्या सील केल्या आहेत.

