पुणे शहर :- सातत्याने सुरू असलेल्या महागाईवाढीमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. नोटबंदी या केंद्र सरकारने लादलेल्या कृत्रिम आपत्तीमुळे आणि सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे जनता त्रस्त झाली आहे.
● त्यातच भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा फटकाही सामान्यांना बसत आहे.
● या परिस्थितीत केंद्र सरकारने योग्य धोरणे आखून सामान्यांना दिलासा दिला नाही, तर राजकीय पक्षच नव्हे, तर सामान्य जनताही रस्त्यावर उतरून भाजप नेत्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही.
● सत्तेवर येताच भाजप नेत्यांच्या संवेदना मेल्या असून, जनतेची दुर्दशा पाहण्यातच नेते समाधान मानत आहेत.
● सामान्य जनता रस्त्यावर उतरल्यास भाजप नेत्यांना रस्त्यांवर फिरणे मुश्किल होईल, असा इशारा शनिवारी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आला.
● गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या महागाईवाढीच्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज (शनिवारी) बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर ‘महागाईविरोधी जनआक्रोश आंदोलन’ करण्यात आले.
● यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, महेश हांडे, महेंद्र पठारे, प्रदीप देशमुख आदी कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

