Pune City News
आरोग्यमनोरंजन

घुसमट,नैराश्य आणि आत्महत्या! – सुहास सोहोनी

★ साधी टाचणी टोचली तरी विव्हळणारी माणसे परिस्थिती आणि विचारांच्या भोवऱ्यात सापडून झटक्यात स्वत:ला नष्ट करतात. निराशेच्या गर्तेत डुंबलेलं दुर्बळ मन आत्महत्या करण्याच्या काही काळ आधी विचारांच्या झंझावातात सापडून कसे कुरतडले जात असेल ! डिप्रेशन या विकारातील अती औदासिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आत्महत्येच्या घटना घडतात मग ती व्यक्ती शेतकरी असो की प्रेमवीर. विद्यार्थी , नोकरीतील कुणीही पदाधिकारी, पोलिस किंवा सैन्यातील अधिकारी सुद्धा आपले मौल्यवान जीवन संपवू शकतात.

★ प्राप्त परिस्थितीशी सामना करण्याचे टाळुन आत्महत्येची पळवाट कां स्विकारावीशी वाटते? मनावरचा ताण गुरुजन मित्र, आप्तेष्ट या कुणाच्या लक्षांत कां येत नाही? आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचणारी व्यक्ती काही सुचक इशारे देत असते. कुणीतरी सावध रहायला हवे. सुंदर भविष्यासाठी कुणीतरी उर्जा, उमेद द्यायला हवी. अपयश, फसवणूक, गुन्ह्याची तीव्र टोचणी, विषाद, वैफल्य, चीड, क्रोध, सुड, छळ , बेरोजगारी, गरीबी, अत्यंतीक व्यसनाधिनता, जुनाट व्याधी, वेदना, कायम गडगडणारा शेअर बाजार अशा अनेक संकटांशी मुकाबला करण्याची मनाची ताकद हरवली असते, तोच माणूस आत्महत्येचा मार्ग शोधतो.

★ स्वत:च्या परिवाराला वाऱ्यावर सोडून मृत्यूला जवळ करणारे असतात, पण आपल्या लाडक्या परिवाराची हत्या करून स्वत:चं जीवन संपवणाऱ्या अगतीकतेला काय म्हणावं! ही मानसिकता आमच्या समाजमनाला ओळखता येत नाही, हे समाजाचं अपयश म्हणावं लागेल . दुर्बळ मन नेहमीच निराशावादी असून आव्हाने किंवा समस्येशी झुंझण्याची इच्छा संपलेली असते. प्रत्येक प्रश्न त्या व्यक्तीला नामोहरम करत असतो. पलायनवादाचा मार्ग स्विकारण्यामुळे , केवळ आत्महत्येचा विचार बळावून घोर निराशेच्या अंतीम क्षणात, मनाच्या एका चमत्कारीक अवस्थेत आत्महत्या घडून जाते. कर्जबाजारी असलेलं कुटुंब, कामाचा ताण असह्य झालेले पोलिस, अपयश पचवता न आलेले मुले मुली , निवासी डॉक्‌टर, शेअर ब्रोकर, व्यावसायीक या समाज घटकांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला . का ? काय साधले त्यामुळे ? सामाजीक समस्या समुळ नाहीशी झाली का?

★ आपण जे पेरतो तेच उगवतं. भ्रष्टाचारांचं बीज सहज पेरलं जात आहे. देशी विदेशी दारुला (म्हणजे वाईन नाही, असं म्हणतात) सध्या राजाश्रय आहे. मटका, लॉटरी सेंटर, शेअर बाजार हे सगळ अधिकृत सरकारी आहे, अवैध मार्गाने उपलब्ध असलेले अंमली पदार्थ, पराकोटीची विषमता, चंगळवादी भोगवादी जीवन शैली , या आणि अशा वृक्षवल्लींना फळे ती कोणती लागणार !

★ हे असेच जर चालू राहिले तर पुढील पाच वर्षात आत्महत्यांच्या घटनांमध्ये शेकडो पटीने वाढ होईल अशी साधार भिती वाटते. नैराश्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या साठी समुपदेशनाची व्यवस्था हवी, ती एक गरज असते. परंतु कुणावर अशी वेळच येवू नये यासाठी समाधानी वृत्ती, सत्वगुण व सत्‌विचारांची वैचारीक बैठक, ईश्वरीय तत्वांवर पूर्ण श्रद्धा, मेडिटेशन या सर्वांद्वारे जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडवून आणायला हवा.

★ अडचणीच्या वेळी आपण एकटे नाही ही सार्थ भावना आणि खात्री हवी. नैराश्य आलेल्या व्यक्ती वेळीच ओळखून त्यांना काळजीपुर्वक मदत व दिलासा देण्याची व्यवस्था समाजसेवी संस्था वा व्यक्तींनी सांभाळावी.प्रगतीच्या आणि विकासाच्या झगमगाटात उजळुन निघत असलेल्या #समाजमनाच्या तळाशी डोकावून पाहिलं तर नैराश्य लपेटून काही आपले सगेसोयरे घुसमटताहेत, आक्रंदत आहेत. त्यांना मदत करायची ना?

सुहास सोहोनी
मोबा:- 9405349354
क्षण वेचतांना [मराठी लेख संग्रह -२०१२]

Related posts

पुणे शहरात आज ५३१३ पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

नायडू रुग्णालयातील ” त्या” 22 जणांच्या मृत्यूची चौकशी करा

Vishal Khandagale

पुणे शहरात होळी व धूलिवंदनविषयी मोठा निर्णय!

Vishal Khandagale

Leave a Comment