विमानतळ पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपायांना गंभीर आरोपांमुळे निलंबित करण्यात आले आहे. हे शिपाई चादर विक्री करणाऱ्या युवकांकडून हप्ता मागणी करत होते, असे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. हा धक्कादायक प्रकार १७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ ते ३ वाजता च्या दरम्यान विमाननगर येथील दत्त मंदिर चौकात घडला.
हप्ता मागणीमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन
विमानतळ परिसरात चादर विक्री करणाऱ्या युवकांकडून आर्थिक हप्ता मागितल्याच्या या आरोपांमुळे पोलिस दलातील भ्रष्टाचाराच्या गंभीर स्वरुपावर प्रकाश पडला आहे. दोन पोलीस शिपाई दोषी आढळल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची तात्काळ कारवाई
परिमंडळ 4 चे पोलीस उप-आयुक्त हिंमत जाधव यांनी या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेतली आणि दोषी शिपायांचे निलंबनाचे आदेश दिले. पोलिस दलात अशा प्रकारांना थारा दिला जाणार नाही, याचा इशारा देत त्यांनी कारवाई केली आहे.
या घटनेमुळे पोलिस दलाच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

