PUNE CITY NEWS :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोघांच्या वादात तिसऱ्याचा खून अशी काहीशी परिस्थिती घडली आहे. एका तरुणाला कोयते दगडी पाटा त्याच्या डोक्यात घालून त्याची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या हत्याकांडात सहभागी अल्पवयीन आरोपींना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर गोविंद सुतार (वय २३) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मुख्य सूत्रधार विनोद उर्फ पप्प्या राकेश पवार (वय २१), अजय उर्फ एबी गणेश भिसे (वय २०) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या घटनेचा मुख्य आरोपी पप्प्या पवार आणि अर्जुन पात्रे नावाच्या तरुणाचे एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वाद होता. त्या रागातूनच अर्जुन पात्रेला मारायचे असे आरोपींनी ठरवले होते. त्यानुसार शनिवारी (दि.२२) रोजी मध्यरात्री त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला.
तो तिथे नव्हता. त्याच्या घराचा समोर शंकर सुतार हा झोपलेला होता. आधीच रागात असलेले आरोपी यांनी शंकरला झोपेतून उठवले व तो काही बोलण्याच्या आत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. यानंतर, शंकरचा त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी सहा अल्पवयीन मुले आणि दोन आरोपी घटनस्थळावरून फरार झाले होते. पिंपरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांतच दोन मुख्य आरोपींना जेरबंद करत सहा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.

