हरणाच्या शिंगाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सांबर जातीचे शिंग जप्त करण्यात आले आहे. चंद्र दानसिंग आवजी -{ वय २९ , रा. सहकारनगर} असे अटक करण्यात आलेल्याचे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात भारतीय वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अवैध प्रकरणांना आळा घालण्यासाठी वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्या आहेत. तर रस्त्यावरची गुन्हेगारी अन घरफोड्या तसेच लूटमार काही थांबत नसल्याचे दिसत आहे. यापार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा काम करत आहे. यादरम्यान दत्तवाडी पोलिसांचे तपास पथक माहिती घेत असताना पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे व शरद राऊत यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की तळजाई वनविहार परिसरात एकजण येणार असून, त्याच्याकडे दुर्मिळ असे हरणाचे शिंग असून, तो विक्री करणार आहे. यानुसार पथकाने याठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सांबर हरणाचे शिंग मिळून आले. ते जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याने हे शिंग कोणाकडून आणले तो ते विक्री कोणाला करणार होता, याचा तपास करण्यात येत आहे.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, कुंदन शिंदे, महेश गाढवे, नवनाथ भोसले व अक्षयकुमार वाबळे यांच्या पथकाने केली आहे.

