सततच्या अपघाताने नागरिक हैराण!
पुणे | प्रतिनिधी धानोरी-भैरवनगर परिसरातील मातोश्री गार्डनसमोर सतत होत असलेल्या अपघातांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या कडेला वाढलेली अतिक्रमणे आणि या भागात फुटपाथची सुविधा नसल्याने पादचाऱ्यांना थेट रस्त्यावरूनच मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांच्याही सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मातोश्री गार्डनसमोर रस्त्यालगत अतिक्रमणे वाढल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा कमी होत आहे. त्यातच फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. गर्दीच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये वारंवार अपघात होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया :
स्थानिक नागरिक राजू ठोंबरे म्हणाले, “मातोश्री गार्डनसमोर सातत्याने अपघात होत आहेत. या ठिकाणी फुटपाथ नसल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून चालावे लागते. त्यातच रस्त्यालगत अतिक्रमणे वाढल्याने वाहनांना जाण्यासाठी जागा कमी पडते. महापालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने अतिक्रमणे हटवावीत आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात.”
या परिसरात अपघातांची मालिका सुरू असतानाही अतिक्रमण हटविण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे
महापालिका प्रशासनाने मातोश्री गार्डनसमोर तातडीने पाहणी करून अतिक्रमणांवर कारवाई करावी, पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि अपघात टाळण्यासाठी आवश्यक वाहतूक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“फुटपाथ नाही, अतिक्रमण वाढले आणि सतत अपघात होत आहेत; महापालिका प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?” असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

