पुणे : पुणे महानगरपालिका भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधानाची प्रत हातात घेऊन सत्ताधारी भाजपच्या कथित मनमानी आणि हुकूमशाही कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्तांना निवेदन देत विविध मागण्या मांडण्यात आल्या.
लोकप्रतिनिधीने विकासकामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केल्यामुळे संबंधित प्रभागातील विकासनिधी रोखण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. “एखाद्या लोकप्रतिनिधीने प्रश्न विचारला म्हणून त्याच्या प्रभागाचा निधी रोखणे हा राजकीय सूड नसून नागरिकांच्या विकासाच्या हक्कावर घाला आहे,” असा आरोप आंदोलकांनी केला.
सत्तेच्या जोरावर कायदा आणि लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करणारे निर्णय स्वीकारले जाणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी पक्ष संघर्ष करत राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही आंदोलनादरम्यान करण्यात आली. स्मारकासाठीचा निधी शून्य करण्यात आल्याचा आरोप करत महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र देण्यात आले. शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने स्मारकाचे काम पूर्ण होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्यपद्धतीचा दाखला देण्यात आला. “अजितदादांवर विरोधकांनी कितीही आरोप-प्रत्यारोप केले, तरी त्यांनी राजकीय द्वेषातून कोणत्याही लोकप्रतिनिधीचा किंवा नागरिकांच्या विकासाचा निधी रोखला नाही. त्यांच्यासाठी विकास हा पक्षीय राजकारणापेक्षा मोठा होता,” असा दावा आंदोलकांनी केला.
महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता, लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरदायित्व आणि सर्व प्रभागांना समान विकासनिधी मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या कथित अन्यायकारक निर्णयांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

