केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच तीव्र होत आहे.
आज आंदोलनाचा १७ दिवस होता मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नसल्याने, शेतकरी संघटना आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. एवढेच नाहीतर आता आंदोलनाचे स्वरूप आणखी तीव्र करण्याचा इशाराही एकप्रकारे दिला आहे.
या पार्श्वभूमीवर आता सर्व शेतकरी संघटनांचे नेते १४ डिसेंबर रोजी एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार असल्याचे आज संयुक्त किसान आंदोलनचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू यांनी सांगितले आहे.
आंदोलनाच्या १७ व्या दिवशी देखील काहीच तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटनांकडून आता उपोषणाचा इशारा दिला आहे.
माध्यमांशी बोलताना संयुक्त किसान आंदोलनचे नेते कमलप्रीत सिंह पन्नू म्हणाले, १४ डिसेंबर रोजी सर्व शेतकरी नेते सिंघू सीमेवर एकाच व्यासपीठावर उपोषणास बसणार आहेत.
सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावे अशी आमची इच्छा आहे. आम्ही या कायद्यांमधील दुरूस्तीच्या बाजूने नाही. केंद्राला आमचे आंदोलन उधळायचे आहे, आम्ही ते शांततेच्या मार्गाने सुरूच ठेवणार आहोत, असेही ते म्हणाले.

