Pune City News:- आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये कारखान्यातून वायू गळती झाल्याने वायूचा कमाल प्रभाव सुमारे एक ते दीड किमी परिसरात होता, तर वास दोन ते अडीच किमी भागात पसरला होता. या घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आरआर वेंकटपुरम गावात असलेल्या ‘एलजी पॉलिमर्स इंडिया’ कंपनीत पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास रासायनिक वायू गळती झाली.
यामध्ये एका चिमुरड्यासह 8 जणांचा मृत्यू झाल्याचं दुर्दैवी वृत्त आहे. या प्लांटजवळील रहिवाश्यांनी डोळ्यात जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार सुरुवातीला केली होती. जवळपास 200 पेक्षा जास्त नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
1961 मध्ये ‘हिंदुस्थान पॉलिमर’ नावाने स्थापना केली गेलेली ही कंपनी दक्षिण कोरियाच्या एलजी केमने ताब्यात घेतली आणि 1997 मध्ये एलजी पॉलिमर्स इंडिया असे नामकरण केले. प्लांटमध्ये पॉलिस्टीरिन बनवले जाते. हे प्लास्टिक खेळण्यांसारखी ग्राहकोपयोगी उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जाते.

