Pune City News :- करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसुत्रता येईल. कंटेन्मेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा तसेच पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण क्षेत्र मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा, करोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकाना उपचार मिळालेच पाहिजेत, असे स्पष्ट निर्देशही श्री पवार यांनी दिले.
प्रारंभी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी करोना संसर्ग रोखण्यासाठी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. मुंबईत कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्था, बेड व्यवस्था, तसेच डॉक्टरांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण, कोरोनामुक्त झालेले रुग्ण तसेच कोरोना संसर्ग विषयक सद्यस्थिती, आरोग्य सुविधा आणि उपलब्ध सामग्रीबाबत माहिती दिली.
पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकाक्षेत्रात कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली.

