Pune City News:- संपूर्ण जग प्राणघातक कोरोनाच्या संसर्गाला जोरदार लढा देण्यात व्यस्त आहे. अशात टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलणे हेच सर्वांच्या हिताचे ठरेल असे मत भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले आहेत.
२ जुलै ते ९ ऑगस्ट, २०२० या कालावधीत टोकियो येथे होणार्या ऑलिम्पिकला स्थगिती देण्याचे आवाहन जोरदार सुरु झाले आहे.
या प्राणघातक विषाणूच्या उद्रेकामुळे क्रीडा जगतातील बहुतेक प्रमुख कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलले गेले आहेत.
या महामारीमुळे आता पर्यंत २,४४,५५३ लोकं संक्रमित झाले आहेत आणि तब्बल १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
गोपीचंद यांनी बोलताना सांगितले, “ऑलिंपिक स्पर्धाबाबत मला शंका वाटते. ऑलिंपिक आता फार दूर राहिले नाही. आता तयारीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे, प्रत्येक खेळाडूला दिलासा मिळण्यासाठी आयओसी ला आताच निर्णय घ्यावा लागेल.”
ते पुढे म्हणाले, “मला वाटतं, सध्याच्या परिस्थितीत संपूर्ण जगाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे. सर्व प्रवासावरचे निर्बंध लक्षात घेता, सर्वांसाठी हा एक कठीण काळ आहे. म्हणून मला वाटते ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलल्यास अधिक चांगले होईल.”

