Pune City News :-‘कोरोनाच्या रूपाने आज राज्यावर संकट आलंय. मात्र, संकटांवर धैर्याने मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. उद्याचा महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाचे स्मरण करून कामाला लागू या. यश नक्कीच मिळेल,’ असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रासह देशात उद्भवलेली परिस्थिती व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.
अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरेदेखील दिली. ‘राज्यातील बाधितांचा आकडा वाढतोय हे खरं असलं तरी नाउमेद होण्याचं कारण नाही. चाचण्या वाढल्यामुळं ही संख्या वाढल्याचं दिसतंय.ही संख्याही नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करतेय. पोलीस, आरोग्य यंत्रणा, मीडिया यांच्यासह राज्यातील जनताही त्यांना सहकार्य करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

