शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड या मोठ्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर सोने आणि चारचाकी वाहन देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला फसविल्या प्रकरणी शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी संतोष सावंत आणि कंपनीच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकास पिस्तुल दाखवत धमकावले तर पोलीस कर्मचारी सावंत यांनी पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. या गुन्ह्याने शहर पोलीस दलात खळबळ माजली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. यातील सर्व आरोपींनी आपआपसात संगनमत व कट रचून त्यांच्या शुभ ट्रेड बीज कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास महिन्याला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवले. त्यात दुचाकी, कार, सोने यासारखी बक्षीस देऊ असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. तर विश्वास बसवा यासाठी वृत्तपत्र, युट्युब, फेसबुक यासारख्या माध्यमातून जाहिरात केली. त्यानंतर फिर्यादी यांना ६३ लाख रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यातले परतावा म्हणून ३ लाख ७८ हजार रुपये परत दिले. पण नंतर पैसे दिले नाही. फिर्यादी गेले असता त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तर यानंतर पोलीस कर्मचारी संतोष सावंत याने फिर्यादी यांच्या दाजीला बोलवून घेत शिवीगाळ करत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्या मर्सिडीजची तोडफोड केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार जुलै २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत घडला आहे.

