Pune City News
Uncategorizedपिपरी चिंचवडपुणेपुणे शहरमहाराष्ट्रराष्ट्रीय

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

पुणे : असंख्य कष्टकरी, कामगार, हमाल, रिक्षाचालक, फेरीवाले, कचरा वेचक, देवदासी, धरणग्रस्त, दलित आणि उपेक्षितांचे आयुष्य उजळवणारे, सामाजिक समतेचा लढा आयुष्यभर झेलणारे ज्येष्ठ समाजसुधारक, कामगार नेते आणि थोर मानवतावादी डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९०) यांचे दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पुण्यातील पूना हॉस्पिटल या ठिकाणी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातील श्रमिक चळवळीवर शोककळा पसरली आहे. कामगार वर्गासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. “मी माझ्या पाठीचा मालक आहे” हा हमाल पंचायतीचा नारा केवळ घोषवाक्य नव्हता, तर तो आत्मसन्मानाचा आणि स्वाभिमानाचा घोषणा पत्र ठरला.

उपेक्षितांचा आवाज बनलेले जीवन १ जून १९३० रोजी पुणे येथे जन्मलेल्या बाबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले बालपण घालवले. तीन महिन्यांचे असतानाच वडिलांचे छत्र हरपले. आई बाबूताई आणि मामांच्या आधारावर त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. १९५२ मध्ये त्यांनी आयुर्वेदाचार्य म्हणून शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा सुरू केली. मात्र समाजातील अन्याय पाहून त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून पूर्णवेळ समाजकार्याचा मार्ग स्वीकारला.

हमाल पंचायतीपासून कायदे निर्मितीपर्यंतचा प्रवास १९५५ मध्ये त्यांनी देशातील पहिली असंघटित कामगार संघटना असलेली “हमाल पंचायत” स्थापन केली. त्यानंतर—माथाडी कायदा, धरणग्रस्त पुनर्वसन कायदा, देवदासी पुनर्वसन कायदा, झोपडपट्टी पुनर्वसन कायदा यांसारख्या क्रांतिकारी कायद्यांसाठी त्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिला. १९८१ पासून ते माथाडी मंडळाचे अध्यक्ष म्हणून हजारो कष्टकऱ्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, निवास आणि पेन्शन मिळवून देणारे आधारस्तंभ ठरले.

सत्याग्रह, तुरुंगवास आणि अपार संघर्ष ५३ वेळा तुरुंगवास धरणग्रस्त आंदोलनात एका डोळ्याची दृष्टी गमावली आणीबाणी काळात १९ महिने कारावास वयाच्या ७५ व्या वर्षी महाड ते दिल्ली सायकल रॅली हा संघर्षाचा इतिहास नव्हे, तर त्यागाची गाथा होती.

“एक गाव, एक पाणवठा” – माणुसकीचा झरा १९७२ मध्ये सुरू केलेली “एक गाव, एक पाणवठा” चळवळ म्हणजे जातीभेदाविरुद्धचा ऐतिहासिक लढा ठरला. दलितांना पाण्याचा समान अधिकार मिळवून देण्यासाठी बाबांनी संपूर्ण महाराष्ट्र पायदळ फिरून जनजागृती केली.

समता, विज्ञाननिष्ठा आणि धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार, विषमता निर्मूलन समिती,अंधश्रद्धा निर्मूलन आंदोलन,राष्ट्रीय एकात्मता समिती, मुस्लिम सत्यशोधक मंडळ या माध्यमातून त्यांनी धर्म, जात, लिंगभेदाच्या विरोधात अखंड लढा दिला.

कामगारांसाठी शाळा, घरं, बँक, रुग्णालय, हमाल नगर – ४०० घरांचे सामाजिक गृहनिर्माण, कष्टाची भाकर – १२ शाखांचा स्वस्त भोजन उपक्रम, हमाल सहकारी बँक, हमाल विद्यालय व ग्रंथालय, ग्रामीण रुग्णालय  हे सगळे उपक्रम म्हणजे कष्टकऱ्यांच्या आयुष्यातील क्रांती होती.

श्रमिक चळवळीचा भीष्माचार्य हरपला ९० वर्षांचे वय असतानाही बाबांचा संघर्ष थांबला नव्हता. शेवटच्या श्वासापर्यंत ते कामगारांच्या हक्कासाठी लढणारे योद्धे होते. त्यांच्या निधनाने केवळ एक व्यक्ती नाही, तर एक चालता-बोलता संविधानच हरपले आहे.

अंतिम सलाम…डॉ. बाबा आढाव हे केवळ समाजसुधारक नव्हते, ते समतेचे चालते प्रतीक होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची ताकद देत राहील. भावपूर्ण श्रद्धांजली!

Related posts

पं.भीमसेन जोशी जन्मशताब्दी निमित्त ‘खयाल यज्ञ’ संगीत महोत्सव

Vishal Khandagale

कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची सर्वपक्षीय आढावा बैठक पार……

Vishal Khandagale

मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत

Vishal Khandagale

Leave a Comment