Pune City News
पुणेपुणे शहरमहाराष्ट्र

पुण्यात निवडणुकीपूर्वी प्रचंड राजकीय घोळ : उमेदवारी, जागावाटप आणि पक्षांतर्गत अस्वस्थता

पुणे : आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील राजकारण पूर्णतः अस्थिर झाले असून, गेल्या २४ तासांत घडलेल्या घडामोडींमुळे सर्वच पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार, अशी जोरदार चर्चा सुरू असताना ऐनवेळी एकत्र न जाण्याचा निर्णय झाल्याने राजकीय समीकरणे पुन्हा एकदा पूर्णपणे बदलली आहेत.

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाची शिवसेना असणार, हे स्पष्ट होताच रात्री उशिरा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते शहरातील हॉटेलमध्ये दिसल्याची माहिती समोर आली. यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली. या पार्श्वभूमीवर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र काही दिवसांतच जगताप यांचा मूळ पक्ष नव्या पक्षासोबत जागावाटपाच्या चर्चेत सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे पक्षांतर्गत संभ्रम अधिकच वाढला.

दरम्यान भाजपमध्ये उमेदवारांची यादी अक्षरशः शेअर मार्केटच्या आकड्यांप्रमाणे बदलत असल्याचे चित्र आहे. रोजचे सर्वे, रोजचे फीडबॅक आणि रोजचे अपडेट घेऊन उमेदवारांची नावे ठरवली जात आहेत. काल जे नाव आघाडीवर होते, ते आज अचानक पिछाडीवर गेले आहे, तर ज्याचा जवळपास पत्ता कट झालेला मानला जात होता तो उमेदवार पुन्हा रेसमध्ये आला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी पक्षनेत्यांनी अनेक इच्छुकांना दिलेली आश्वासने आता डोकेदुखी ठरत आहेत. ही कमिटमेंट पाळताना पक्षासाठी २० ते ४० वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक आमदार व खासदारांनी आपल्या मुलाबाळांची आणि जवळच्या नातेवाईकांची नावे उमेदवार यादीत टाकली होती. मात्र अचानक मुंबईहून आदेश येतो की लोकप्रतिनिधींच्या मुलांना आणि नातेवाईकांना उमेदवारी दिली जाणार नाही. त्यामुळे सुधारित यादी तातडीने मुंबईला पाठवण्यात आली.

या सगळ्या प्रक्रियेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. प्रत्येक निवडणुकीत प्रचारासाठी संघाची यंत्रणा वापरली जाते. यावेळी पुणे महापालिकेत चार ते पाच संघ स्वयंसेवकांना संधी द्यावी, अशी इच्छा संघातील काही महत्त्वाच्या मंडळींनी व्यक्त केली आहे. संघाकडून सुचवलेल्या नावांचा विचार होणार की नाही, यावरून अंतर्गत पातळीवर मोठी धडपड सुरू आहे.

महाविकास आघाडीत काँग्रेस ५०, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ५० आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ५० असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगितले जात असताना वंचितसाठी केवळ १५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला. हा प्रस्ताव वंचितने स्पष्टपणे फेटाळल्याने आघाडीतील तणाव अधिकच वाढला आहे.

दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातही तणाव निर्माण झाला आहे. पुण्यात या दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने जागावाटपावरून थेट यांना लक्ष घालावे लागले. रावेत परिसरात शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. शिवसेनेने काही अंशी माघार घेतली असली, तरी महाविकास आघाडीच्या एकूण जागावाटपात मनसेच्या हाताला नेमके काय लागणार, हा प्रश्न कायम आहे.

दरम्यान, कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकर आणि त्याच्या घरातील दोन महिलांनी उमेदवारी अर्ज भरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र प्रत्यक्षात हे तिघे अर्ज न भरताच परत गेल्याचे स्पष्ट झाले. याच दिवशी शिवसेनेच्या एका बैठकीत विजय शिवतरे आणि नाना भानगिरे यांच्यात जोरदार वाद झाला. या वादानंतर नाना भानगिरे यांनी बैठक सोडून बाहेर पडल्याची माहिती आहे.

काँग्रेसमध्ये यांच्या प्रवेशानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आता तेच अरविंद शिंदे काँग्रेस भवनात जगताप यांचा यथोचित सत्कार करताना दिसत आहेत. हा बदलही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजपकडून विरोधक जिवंत ठेवले जातील की नाही, अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने दिलीप बराटे आणि अभिजीत शिवरकर या दोन माजी नगरसेवकांचा पक्षात प्रवेश करून घेतला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असताना देखील कोणत्याच पक्षाची अंतिम यादी जाहीर झालेली नाही. भाजपने २६ डिसेंबरला यादी जाहीर करण्याचे संकेत दिले होते, मात्र आता ही यादी २९ डिसेंबरच्या मध्यरात्री जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या सगळ्या घडामोडींमध्ये सामान्य कार्यकर्ता पूर्णपणे बाजूला पडल्याचे चित्र आहे. ज्याच्या जीवावर निवडणूक लढवली जाते, तोच कार्यकर्ता आज असुरक्षित आणि अस्वस्थ आहे. केंद्रीय राज्यमंत्री इच्छुकांना उपलब्ध असताना त्यांचा एक कटाक्ष आपल्यावर पडावा यासाठी इच्छुकांची मोठी धडपड सुरू आहे. “मुरलीधर अण्णांनी पाहिलं की तिकीट फिक्स” अशी भाबडी मानसिकता निर्माण झाल्याने ते सध्या पुण्यात अत्यंत गुप्तपणे फिरत असल्याची चर्चा आहे.

गेल्या २४ तासांत माध्यमांपर्यंत पोहोचलेल्या घडामोडींपेक्षा अनेक घडामोडी शहरात पडद्यामागे घडल्या आहेत. सेकंदागणिक निर्णय बदलत असून कोण कुणाकडे आहे, कोण कुठे जाणार, कोण कुणाची सुपारी घेत आहे आणि कोण भाजपची ‘बी टीम’ आहे, हे ओळखणेही कठीण झाले आहे.

एकीकडे भाजपची शक्ती मोठ्या प्रमाणात एकवटलेली असून अंतर्गत कलह असूनही डॅमेज कंट्रोल यंत्रणा मजबूत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत किती पक्ष असणार, यावर निर्णय घेतानाच अनेक दिवस वाया गेले. त्याचा थेट फायदा भाजपला होत असल्याचे चित्र आहे. या प्रक्रियेत सर्वाधिक नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे झाले असून अनेक अनुभवी शिवसैनिकांनी पक्ष सोडून भाजप किंवा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेकडे निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित उरल्याचे वास्तव समोर येत आहे.

यामुळेच आता महाविकास आघाडीसह सर्व विरोधकांच्या नजरा भाजपच्या उमेदवार यादीकडे लागल्या आहेत. भाजपची यादी जाहीर होईपर्यंत कुठलाही पक्ष आपली अंतिम उमेदवारी जाहीर करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका दिसून येत असून पुढील दोन दिवसांत पुण्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts

सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच; एम्सकडून शिक्कामोर्तब

Vishal Khandagale

खेड शिवापूर टोल नाक्यावर चाकरमानी व पर्यटक बेहाल !

Vishal Khandagale

देहूत संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याला शुकशुकाट !

Vishal Khandagale

Leave a Comment