Pune City News:- ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपने सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी लोकनेता व पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना लक्ष्य केले असून, भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा वरदहस्त असल्याशिवाय महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वामध्ये असे करण्याची ताकद नाही,’ अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या अंतर्गत वादावर टिप्पणी केली.
खडसेंसारखा लोकनेता काँग्रेसमध्ये आल्यास त्यांचा पक्षासाठी फायदा होईल, असेही ते यावेळी म्हणाले. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्याने एकनाथ खडसे संतापले व त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर चांगलीच टीका केली.
त्यावरून खडसे व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये बराच कलगीतुराही रंगला होता. त्यावेळी खडसे यांनी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सहाव्या जागेची ऑफर असल्याच्या गौप्यस्फोट केला. त्यावर खडसे काँग्रेसची विचारधारा स्वीकारत असतील, तर त्यांचे निश्चित स्वागत करू, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
याच पार्श्वभूमीवर पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित ऑनलाइन वार्तालाप कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी खडसे यांना लक्ष्य करण्यामागे भाजपच्या दिल्ली नेतृत्वाचा हात असल्याचा आरोप केला.

