कोरोना आपत्ती निवारणाच्या कामासोबतच प्रलंबित तसेच दैनदिन कामकाज गतीने होण्यासाठी “माझे संकलन, माझी जबाबदारी” मोहिम राबविण्यात येत आहे. कोरोना विषयक कामकाजासोबतच इतर विकासकामे व सर्वसामान्य नागरिकांची कामे मार्गी लागण्यासाठी ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज व्यक्त केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कोरोना संसर्ग कालावधीत संपूर्ण प्रशासन कार्यरत आहे, त्यामुळे नागरिकांचे दैनदिन कामकाज प्रलंबित राहण्याची शक्यता विचारात घेत ‘माझे संकलन, माझी जबाबदारी’ मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, माझे संकलन, माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत प्रलंबित कामे गतीने मार्गी लावा, तसेच कार्यालयातीन कामकाजात सकारात्मकता ठेवून गुणवत्तापूर्ण काम करण्यासाठी प्रत्येकाचा प्रयत्न महत्त्वाचा ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. झिरो पेंडन्सी अभियानाच्या माध्यमातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने सातत्याने राज्यात आदर्श निर्माण केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

